पावसाच्या पहिल्याच तडाख्यात ठाणे झाले जलमय

thane-rain

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : महापालिका क्षेत्रात योग्यप्रकारे नालेसफाई करण्याबरोबरच सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे दावे पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. मात्र, गुरुवारी तासभर झालेल्या मुसळधार पावसाने पालिकेचे सज्जता आणि नालेसफाईचे दावे फोल ठरवले. शहरातील अनेक सखल भागांत गुडघाभर पाणी साचले होते. पालिका मुख्यालय परिसरातील नालाही तुंबला होता.

स्वच्छता, सुशोभीकरण, नाल्याच्या प्रवाहात अडथळे ठरणारी नागमोडी वळणे सरळ करणे, उद्यान, शाळा दुरुस्ती, तलावांचे थीमवर सुशोभीकरण करणे, पाणी तुंबणाऱ्या सखल भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच २१ ठिकाणी पंप बसविणे अशी कामे करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. याशिवाय, सिडको भागात रेल्वे पुलाखाली खाडी भरतीच्या वेळेत पाणी साचू नये यासाठीही बटरफ्लाय वॉल बसविण्याची उपाययोजना करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, गुरुवारी तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने पालिकेचे दावे फोल ठरले आहेत.

ठाणे शहरात गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. दुपारी १२.३० वाजेपर्यंत शहरात ३२.८१ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी ११ ते दुपारी १२ यावेळेत शहरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून परिसर जलमय होण्यास सुरुवात झाली. शहरातील तीन पेट्रोल पंप, वंदना सिनेमागृह, राम मारुती रोड, मासुंदा तलाव, घंटाळी रस्ता, स्थानक परिसर, सिडको या सखल भागात गुडघाभर पाणी साचले होते.

विशेष म्हणजे, महापालिका मुख्यालयातील गटार तुंबून परिसरातही पाणी साचले होते. गटारातील कचरा रस्त्यावर आला होता. शहरात विविध भागात साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली होती. साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here