पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : कामगाराला लुटणाऱ्या २ चोरट्याना म्हाळुंगे पोलीसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. पोलिसांच्या या तात्काळ कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, श्रीनिवास गायकवाड हे २८ जून रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास कंपनी सुटल्यावर घरी पायी निघाले होते.त्यावेळी दूचाकीवरुन आलेल्या दिपक नेटके (वय २९,रा. मेदनकरवाडी ता. खेड) व सौम्यरंजन शाहो (वय २५. रा.मोशी) या दोघा चोरट्यांनी गायकवाड यांना चाकूचा धाक दाखविला आणि त्यांच्याकडील पाच हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने पळवून नेला.त्यानंतर गायकवाड यांनी म्हाळूंगे पोलीसात तक्रार दिली.
म्हाळूंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांनी पोलीस अंमलदार हनुमंत बांगर व अमोल वेताळ यांच्यासह साध्या वेषात आरोपींचा शोध सुरु केला असता वोक्सवॅगन कंपनी ते महिंद्रा कंपनी या रोडवर मोटरसायकलवरील दोघेजण रस्त्याने येणारे जाणारे लोकांची संशयितरित्या टेहळणी करीत असल्याबाबत वेताळ यांना बातमी मिळाली.
चव्हाण व स्टाफ चौकशी करिता त्यांच्याकडे जात असताना पोलिस येण्याची चाहूल त्यांना लागली. दोघे संशयित महिंद्रा कंपनीचे दिशेने मोटर सायकलवरून पळून जाऊ लागले. त्यांनी कॅपिटल सिटी सोसायटी येथें मोटरसायकल थांबावली तेव्हा मागे बसलेला संशयीत सोसायटीच्या पार्किंगकडे पळत जाऊन लपून बसला. स्थानिक लोकांच्या मदतीने पकडून पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने दोघांना २९ जूनला रात्री साडेअकराला अटक करण्यात आली.






