मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका नराधम बापाने आईचे छत्र हरपलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विशेष पॉस्को न्यायालयाने ४८ वर्षीय नराधम बापाला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
पीडित मुलींच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्या आपल्या वडिलांसोबत राहत होत्या. २०१६ मध्ये यातील एका मुलीची मुलासोबत मैत्री झाली होती. मात्र वडिलांना ही बाब खटकल्याने त्यांनी सुरुवातीला मुलीची समजूत काढली आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच मुलींना मारहाण केली जात होती. २०१६ पासून २०१८ पर्यंत हा प्रकार सुरू होता. यातील मोठ्या मुलीचे वय १६ असून लहान मुलीचे वय १४ आहे.
पीडितांच्या शेजारी राहणाऱ्यांना मुलींच्या आरडाओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येत होता. नराधम बाप मुलीला मारहाण करत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी मुलींची सुटका केली आणि पोलिसात धाव घेतली. नंतर हे प्रकरण न्यायालयामध्ये पोहोचले. न्यायालयामध्ये पीडितांनी आपल्यावर होत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला तेव्हा न्यायमूर्तींसह उपस्थित हेलावून गेले.
विशेष पॉस्को न्यायालयाचे न्यायमूर्ती एससी जाधव यांनी वडिलांनी मुलींच्या पालनपोषणाची जबाददारी न निभावता त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असे म्हटले. आई गमावलेल्या मुलींसाठी बापच सर्वस्व होता. जगामध्ये कणखरपणे उभे राहण्यासाठी वडिलांच्या आधाराची त्यांना गरज होती. परंतु वडिलांचे मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि बाप-बेटीच्या नात्याला काळीमा फासला. विशेष म्हणजे लैंगिक अत्याचाराचे हे प्रकरण साधारण नाही, कारण इथे रक्षकच भक्षक झाला, अशी टिपणी न्यायालयाने केली. न्यायालयाने पीडित मुली आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या साक्षिच्या आधारे आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणी आरोपीला २०१८ मध्येच अटक करण्यात आली होती आणि तो सध्या तुरुंगात आहे.






