एक कोटीचा गांजा एलसीबीने घेतला ताब्यात; एक अटकेत

one-cror-cannabis-seized-by-jalgaon-police

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : आंध्रपेदशातून जिल्ह्यात विक्रीस आलेला एक कोटी सहा लाख वीस हजार रुपयांचा गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पकडला. नशिराबाद जवळील तीघ्र शिवारातील एका टेकडीवरील एका घरातून हा गांजा पकडला. पोलिस आल्याची कुणकुण लागताच यातील मुख्य तस्कर पळून गेला आहे. मनोज रोहिदास जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. तर राहुल काशिनाथ सुर्यवंशी (वय २५, रा. वाडीशेवाळा, ता. पाचोरा) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

घटना अशी की, नशिराबाद जवळील तीघ्रे शिवारातील एका टेकडीवर असलेल्या घरात मोठ्या प्रमाणात गांजा साठवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. शहरात झालेल्या दोन सोनसाखळी लुटीच्या घटनेत बकालेंसह पथक भुसावळ येथे संशयितांच्या शोधासाठी निघाले होते. तत्पूर्वी त्यांना गांजाची माहिती मिळाली. यामुळे मंगळवारी सकाळी अतिरीक्त बंदोबस्त मागवून घेत पथकाने तीघ्रे शिवारात छापा मारला. यावेळी तेथे मनोज जाधव नावाचा व्यक्ती मिळून आला.

घरझडती घेतली असता तेथे मोठ्या प्रमाणात गांजाची पोती आढळुन आली. पोलिसांनी सर्व गांजा जप्त करुन नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालींदर पळे, उपनिरीक्षक अमोल देवढे, युनूस शेख इब्राहीम, वसंत लिंगायत, रवी नरवाडे, सुनिल दामोदरे, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, दीपक पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे, नंदलाल पाटील, विजय श्यामराव पाटील, भगवान पाटील, नितीन बाविस्कर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here