- खासदार निधीतून झालेल्या खडीकरण रस्त्याची दुरावस्था कायम
- चौकशी करण्यास प्रशासनाची अनास्था
शहादा (विजय पाटील) – शहरालगतच्या तारामती नगर येथील खडीकरण व मुरमीकरण रस्त्याचे काम झालेले असून
त्याकडे कुठलाही अधिकारी किंवा अभियंता यांनी फिरकूनही पाहिले नसल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम एका खाजगी ठेकेदाराला पूर्ण करण्यासाठी दिले असून त्या कामांमध्ये कुठलेही निकष वापरण्यात आलेले नाही व ते काम योग्य पद्धतीने झालेले नाही असा आरोप येथील स्थानिक करीत आहेत.
सद्यस्थितीत रस्त्याची अवस्था अतिशय खराब असून ठिकठिकाणी खड्डे व खडी उखडून आलेली दिसते.या कामाची निविदा कोणाला दिली व हे काम कोणी पूर्ण केले याविषयी येथील नागरीक पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे कळते.संबंधित काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून त्याची चौकशी व्हावी व संबंधित ठेकेदाराला याचे बिल अदा करण्यात येऊ नये याविषयीची मागणी जोर धरत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर काम निकषाप्रमाणे पूर्ण झाले
असल्याची माहिती दिली मात्र रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे.यावरून एकच गोष्ट लक्षात येते की सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत आहे . ऐन पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. न्याय मागायचा तरी कुणाकडे आणि कसा ? कारण ज्यांच्या कडून न्यायाची अपेक्षा आहे तेच ठेकेदाराच्या प्रभावाखाली असल्याचे लक्षात येत आहे म्हणून त्यांनी कुठलीही कार्यवाही करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.आता खासदार निधीतून झालेल्या या रस्त्याची स्वतः खासदार हिनाताई गावित यांनी चौकशी करावी हीच अपेक्षा येथील नागरिक करित आहेत.








