स्कूलबस चालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

rape-on-minor

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : स्कूल बसमधून ये जा करीत असताना १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला रिलेशनशिपमध्ये राहणार का असे विचारुन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सोमेश्वर घुले पाटील (वय ३५, रा. वडाची वाडी, उंड्री) याला अटक केली आहे. हा प्रकार मार्च, जून आणि १६ जुलै रोजी घडला होता.

याबाबत उंड्री येथे राहणार्‍या एका १५ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ७३४/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही सोमेश्वर घुले पाटील याच्या स्कुल बसमधून शाळेत ये जा करीत असे. त्या दरम्यान त्यांच्यात ओळख झाली. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना घुले याने तिला रिलेशनशिपमध्ये राहणार का असे विचारले. फिर्यादी हिला रिलेशनशिप म्हणजे काय हे माहिती नसताना तिने होकार दिला. तेव्हा त्याने तिच्याबरोबर मार्च, जून २०२२ मध्ये जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. १६ जुलै रोजी ही मुलगी घरी उशिरा आली. तेव्हा तिच्या वडिलांना संशय आला. तेव्हा त्यांनी मुलीकडे सखोल चौकशी केली.

तिने आपल्यावर चौघांनी बलात्कार केल्याचे सांगितले. या प्रकाराने तिचे वडीलांनी तातडीने कोंढवा पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी या मुलीकडे चौकशी केली. तेव्हा बसचालकाबरोबर प्रकरण उघड होऊ नये, म्हणून तिने चौघांनी बलात्कार केल्याचे सांगितल्याचे उघड झाले. वैद्यकीय तपासणीत तिचे शारीरीक संबंध आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सोमेश्वर घुले याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here