इंडियाना : अमेरिकेतून पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. इंडियाना येथील ग्रीनवुड मॉलमध्ये रविवारी संध्याकाळी एका बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केला. यात चार जण ठार झाले तर तिघे जखमी झाले. मॉलमध्ये उपस्थित असलेल्या एका सशस्त्र नागरिकाने हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केलं
इंडियाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी अमेरिकेच्या वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता रायफल घेऊन आलेल्या हल्लेखोराने मॉलच्या फूड कोर्टमधील लोकांना लक्ष्य केलं. तो आणखी लोकांना मारण्याआधीच तिथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने त्याला गोळ्या घालून ठार केलं.
मेयर मार्क डब्ल्यू मेयर्स म्हणाले की, चार मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश आहे. रविवारी संध्याकाळी इमर्जन्सी कॉल सेंटरला इंडियाना मॉलमध्ये गोळीबार होत असल्याची माहिती मिळाली. गोळीबार सुरू झाल्यानंतर हल्लेखोराला एका नागरिकाने मारले आणि त्यानंतर गोळीबार थांबला. ग्रीनवुड पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मी कमांड पोस्टच्या थेट संपर्कात आहे आणि आता कोणताही धोका नाही. मी जनतेला आवाहन करतो की, तूर्तास या क्षेत्रापासून दूर रहा.







