उडप्पी (कर्नाटक) : जिल्ह्यामधील शिरुर येथे एका रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला असून हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बुधवारी (२० जुलै) झालेल्या या अपघातामध्ये रुग्णवाहिका टोल नाक्यावरील गेटला धडकून रस्त्याच्या बाजूला पडल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार हुन्नावर ते कुंदापूर असा प्रवास करत असणाऱ्या या रुग्णवाहिकेमध्ये एक रुग्ण आणि दोन कर्मचारी होते. या तिघांचाही अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तसेच टोल नाक्यावरील एका कर्मचाऱ्याचाही या अपघातात मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पावसामुळे ओल्या झालेल्या रस्त्यावरुन गाडी सरकल्याचं दिसत आहे.
https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/475636584395936/
रुग्णवाहिका येत असल्याचं पाहून टोल नाक्यावरील कर्मचारी रुग्णवाहिकेसाठी राखीव असणाऱ्या लेनवर ठेवण्यात आलेलं प्लास्टिकचं बॅरिकेट काढण्यासाठी जात असल्याचं दिसत आहे. तितक्यात एका नाजूक वळणावरुन टोल नाक्याच्या दिशेने येणाऱ्या रुग्णवाहिकेसमोर एक गाय रस्त्यात बसलेली होती. एका कर्मचारी या गायीला मार्गामधून उठवतो. मात्र ही गाय लेनवरच असल्याने तिला वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेचा चालक जोरात ब्रेक दाबतो.
वेगात असणारी रुग्णवाहिकेला अचानक ब्रेक लावल्याने गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि ती टोल नाक्यावरील बूथला आदळते. या अपघातामध्ये रुग्णवाहिकेतील रुग्णही गाडीबाहेर फेकाला गेल्याचं दिसत आहे. तर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यालाही रुग्णवाहिकेची धडक बसल्याचं स्पष्टपणे व्हिडीओत दिसत आहे.