उत्तराखंडमध्ये भीषण दुर्घटना: चमोलीत निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळून ७ कामगारांचा मृत्यू

उत्तराखंड

देहराडून (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मायापूर भागात एका बोगद्याचे बांधकाम सुरू असताना अचानक भीषण दरड कोसळली. या दुर्घटनेत बोगद्यात काम करणाऱ्या ७ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून २ मजूर अद्याप बेपत्ता आहेत. बोगद्यात अडकलेल्या एकूण २२ मजुरांपैकी १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे.

गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास ‘हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी’च्या (HCC) देखरेखीखाली सुमारे २ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम सुरू होते. बोगद्याच्या आत साधारण १.४ किलोमीटर अंतरावर वरच्या भागातून अचानक मोठी दरड कोसळली. यामुळे निर्माण झालेल्या पोकळीतून प्रचंड वेगाने पाणी, दगडगोटे आणि चिखलाचा ढिगारा थेट बोगद्याच्या आत घुसला. अचानक आलेल्या या मलब्यामुळे आत काम करणाऱ्या मजुरांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि ते अडकून पडले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, जिल्हा आपत्ती निवारण पथक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीय लष्कर, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP), NDRF आणि SDRF च्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले.
बोगद्यात साचलेले पाणी उपसण्यासाठी मोठ्या क्षमतेचे पंप बसवण्यात आले असून बेपत्ता असलेल्या दोन मजुरांचा शोध घेण्यासाठी ढिगारा हटवण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. वरच्या टेकडीवरून दरड कोसळल्याने ही पोकळी तयार झाली असावी, असा प्राथमिक अंदाज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here