अदेन (वृत्तसंस्था) : लाल समुद्रातील बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीमध्ये एका व्यापारी जहाजावर झालेल्या ‘डबल टॅप’ (एकापाठोपाठ दोनदा केलेल्या) क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान सहा जण ठार झाल्याचे येमेन सरकारने जाहीर केलंय. सरकारने या हल्ल्यासाठी इराण समर्थित हुथी बंडखोरांना जबाबदार धरले आहे.
सीएनएनच्या (CNN) वृत्तानुसार, येमेनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारमधील परिवहन मंत्रालयाने सांगितले की, हुथी बंडखोरांनी ‘तिहामाह’ (Tihamah) नावाच्या एका लहान मालवाहू जहाजावर तीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली; हे जहाज अन्नधान्याची वाहतूक करत होते. मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्यांमुळे आग लागली, ज्यात चार कर्मचारी (तीन पाकिस्तानी आणि एक इंडोनेशियन) ठार झाले, तर इतर चार कर्मचारी आणि एक बचावकार्यकर्ता जखमी झाला.
हुथी बंडखोरांनी जहाजावर पुन्हा एकदा हल्ला केला : मंत्रालयाने पुढे सांगितले की, शोध आणि बचावकार्य सुरू झाल्यानंतर हुथी बंडखोरांनी जहाजावर पुन्हा एकदा हल्ला केला. या कृतीचे वर्णन ‘बचाव पथकासह जहाजावरील सर्वांचे प्राण धोक्यात घालण्याचा प्रयत्न’ असे करण्यात आले. येमेनच्या तटरक्षक दलाने नंतर दुजोरा दिला की, मृतांपैकी दोघे जण बचावकार्य करणार कार्यकर्ते होते. सुरुवातीला जहाजाच्या मालकीहक्काबाबत संभ्रम होता. येमेनी अधिकारी आणि ‘मारिस्क’ (Marisk) या सागरी गुप्तचर गटाने सुरुवातीला असे वृत्त दिले होते की, सौदी मालकीच्या जहाजावर हल्ला झाला आहे. मात्र, ‘मरीनट्रॅफिक’ (MarineTraffic) कडील माहितीनुसार, ‘तिहामाह’ हे जहाज टांझानियाच्या ध्वजाखाली चालवले जाते आणि त्याची मालकी इजिप्त आणि येमेनमध्ये नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांकडे आहे.







