कोल्हापूर (प्रतिनिधी) । श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध वार्षिक चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीचे चोख नियोजन आणि विशेष नियमावली लागू करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान डोंगरावर होणारी लाखो भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने एकेरी मार्ग (One Way), प्रवेश बंदी (No Entry) आणि विशिष्ट पार्किंग झोन निश्चित केले आहेत.
यात्रेच्या मुख्य कालावधीत ट्रॅक्टर, ट्रक्स, तीन चाकी वाहने आणि मालाची वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना कुशिरे, केर्ली, वाघबीळ आणि गिरोली मार्गाने जोतिबा डोंगरावर जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने पर्यायी मार्गाने बोरपाडळे फाटा – कोतोली – वाठार आणि एन.एच. ४ राष्ट्रीय महामार्गावरून वळवण्यात आली आहेत. कोल्हापूरकडून जोतिबा डोंगराकडे जाणाऱ्या सर्व बस व चारचाकी वाहनांना केर्ली गाव आणि गायमुख फाटा मार्गे गिरोली किंवा वाघबीळ मार्गाने डोंगरावर जाता येईल.डोंगर उतरताना सर्व वाहने दानेवाडी फाटा – वाघबीळ किंवा दानेवाडी – मालकोतोली – पन्हाळा या मार्गावरून मार्गस्थ होतील.
भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या वाहनांसाठी खालीलप्रमाणे स्वतंत्र वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत: दुचाकी वाहनतळ: यमाई मंदिर पाठीमागील बाजू, एमटीडीसी (MTDC) परिसर आणि नवीन एस.टी. स्टँड समोरील तोरणे कट्टा परिसर. चारचाकी वाहनतळ: यमाई मंदिर डावी व उजवी बाजू, जुने एस.टी. स्टँड समोरील मैदान, नवीन एस.टी. स्टँड परिसर आणि पिंजरा कट्टा. मेन पार्किंग आणि सेंट्रल प्लाझा परिसर.
दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते नवीन एस.टी. बस स्थानक रोड, जुने एस.टी. स्टँड रोड, एमटीडीसी परिसर, सेंट्रल प्लाझा आणि यमाई मंदिर परिसर या मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना कोणत्याही प्रकारची वाहने उभी करण्यास (नो पार्किंग) सक्त मनाई करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांवर पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल.







