१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २१४ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती

जळगाव पोलिसांची

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर रोखण्यासाठी जळगाव पोलिसांनी पहाटेपासून ‘ऑपरेशन ३/२५’ ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवली. या धडक मोहिमेत जिल्हाभरातील २१४ सराईत शस्त्र गुन्हेगारांच्या वास्तव्याची व वाहनांची एकाच वेळी तपासणी करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ७ गावठी कट्टे, ११ जिवंत काडतुसे, १ तलवार, १ चाकू, २५ चोरीचे मोबाईल आणि ३ मोटारसायकली असा एकूण ७ लाख १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १० वर्षांत भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हे दाखल असलेल्या आणि बेकायदेशीर शस्त्रांशी संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सराईत गुन्हेगारांची गोपनीय माहिती संकलित करण्यात आली होती. आरोपींनी शस्त्रे स्वतःजवळ न बाळगता मित्र किंवा नातेवाईकांकडे लपवून ठेवली आहेत का, याची खातरजमा करून आज पहाटे ६ वाजल्यापासून सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथकांमार्फत एकाच वेळी अचानक छापे टाकून तपासणी करण्यात आली.

“जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर सातत्याने करडी नजर ठेवली जाईल. बेकायदेशीर शस्त्रे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची अचानक व धडक मोहीम सुरूच राहील.”
— श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, जळगाव

भुसावळ शहर : किशोर ऊर्फ गोजऱ्या सकरू जाधव (वय ३१, रा. वाल्मीक नगर, भुसावळ) — १ गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे., वरणगाव : रोशन विकास पाटील (वय २६, रा. ओझरखेडा) — १ गावठी कट्टा, १ जिवंत काडतूस., एमआयडीसी (जळगाव) : राजकिरण मानसिंग परदेशी (वय २६, रा. रायपूर) — १ गावठी कट्टा., स्थानिक गुन्हे शाखा कारवाई (एमआयडीसी) : रईस रफीक तांबोळी (वय २१, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) — २ गावठी कट्टे, २ जिवंत काडतुसे., चाळीसगाव शहर : प्रथमेश लक्ष्मण भामरे (वय २०, रा. स्वामी समर्थ नगर) — २ गावठी कट्टे, ६ जिवंत काडतुसे, १ चाकू. चाळीसगाव शहर : जयेश किरणसिंग राजपूत (वय २६, रा. हनुमान नगर) — १ तलवार., दीपक सुभाष मरसाळे (वय ३०, रा. सुवर्णाताई नगर) — २५ मोबाईल फोन व ३ मोटारसायकली (किंमत रु. ४,८६,०००).
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत (जळगाव), अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेप्रमुखांच्या पथकांनी यशस्वी केली.जळगाव पोलिसांची

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here