कुऱ्हाडीने मारहाण करीत पेट्रोल पंपावर दरोडा; दोनजण जखमी

narhe-petrolpump-daroda

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : नऱ्हे परिसरात असलेल्या पेट्रोलपंपावर दरोडेखोराने कुऱ्हाडीचा धाक दाखवत दरोडा टाकला. यामध्ये झालेल्या झटापटीत पंपावरील दोन कर्मचारी जखमी झाले असून ही घटना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

 

नऱ्हे – आंबेगाव या रस्त्यावर भूमकर पुलाजवळ वीकेडी पेट्रोलियम या नावाने पेट्रोलपंप आहे.सोमवारी मध्यरात्री पंपावरील कर्मचारी हे तिथे असणाऱ्या कार्यालयात झोपले होते. दरम्यान दुचाकीवरून आलेल्या एक दरोडेखोराने पंपावरील कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. मात्र कर्मचाऱ्यांनी विरोध करताच त्यांनी एका कर्मचाऱ्याच्या डोक्यात उलटी कुऱ्हाड घातली. तर दुसऱ्याला मारहाण केली. त्यानंतर अंदाजे ४० हजारांची रोकड लंपास करीत त्यांनी पोबारा केला.

दरम्यान याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून माहिती घेतली आहे. घटनेचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. या दरोड्यात अजून किती जणांचा समावेश आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पूर्वीचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना गुन्हेगारांबद्दल जास्त माहिती नसल्याने अशा या गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. चार दिवसांपूर्वी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थनगर परिसरात असणाऱ्या दहीहंडी मंडळाच्या येथे गर्दीच्या वेळी गोळीबार झाल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. या भागात सतत टोळीयुद्ध होत असते. या भागातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याची चर्चा नागरिकांत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here