भोपाळ (मध्यप्रदेश) : नर्सरीमध्ये शिकणाऱ्या बालिकेवर शाळेच्या बसचालकाने बलात्कार केल्याची घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे घडली. पोलिसांनी चालकासह महिला सहायकाला अटक केली आहे.
याबाबत पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी घटना घडली तेव्हा ही महिला सहायक बसमध्ये होती, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. साडेतीन वर्षांची ही बालिका खासगी शाळेत शिकते. गुरुवारी शाळेनंतर ती घरी येत असताना ही घटना घडली. ती घरी आल्यानंतर कोणीतरी तिचे कपडे बदलल्याचे आईच्या लक्षात आले. आईने मुलीचे वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे याबाबत चौकशी केली.
मात्र, दोघांनीही मुलीचे कपडे बदलल्यण्याबाबत नकार दिला. नंतर मुलीने गुप्तांगात वेदना होत असल्याचे सांगितले. पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला. शाळेच्या बसचालकाने बसमध्ये अत्याचार केला आणि नंतर आपले कपडे बदलले, असे तिने पालकांना सांगितले.






