सीवूड्सच्या ”पॉट रिपॉट” पार्लरमध्ये विद्यार्थी हुक्क्याच्या नशेत गुंग

seewood-pot-repot

स्थानिक पोलिसांचे अभय; वारंवार कारवाई तरी अवैध पार्लर पहाटेपर्यंत सुरु; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे तीनतेरा

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : तरुणाईला अमलीपदार्थांचे व्यसन लावण्यासाठी पूरक वातावरण असणारे हुक्का पार्लर मध्यरात्रीपर्यंत राजरोसपणे सुरु असल्याने नवी मुंबईतील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. नवी मुंबईतील हुक्का पार्लरना नियमांबाबत पोलीस प्रशासन तसेच महापालिकेकडून वेळोवेळी सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र हावरे मॉलमधील ”पॉट रिपॉट” हुक्का पार्लरला स्थानिक पोलिसांचे अभय असल्याने नियम धाब्यावर बसवून हा पार्लर दिमाखात पहाटे सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध ऑफर देऊन पार्लरकडे आकर्षित केले जात असून हुक्का या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

सद्यस्थितीत देशात अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे मध्यंतरी घडलेल्या घटनांमधून पाहायला मिळत आहे. सुपरस्टार शारुख खान याच्या मुलाची अशाच एका प्रकरणातून जामिनावर मुक्तता करण्यात आली. अमली पदार्थ सेवन करण्याकरिता पोषक असे वातावरण उपलब्ध असलेल्या हुक्का पार्लरमधून अनेकदा तरुणाईकडून पाहिल्यांदा अमलीपदार्थ सेवन करण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. याच पार्श्वभूमीवर तत्कालीन राज्य सरकारने एका विशेष विधेयकाद्वारे हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचे विधेयक पारित केले. यानंतर नवी मुंबईसह सर्व शहरातील हुक्का पार्लर काही काळ बंद होते. मात्र न्यायालयाने दिलेल्या आयुर्वेदिक (हर्बल) हुक्का पार्लर चालवण्याच्या परवानगीनंतर हर्बल नावाखाली तंबाखूमिश्रित हुक्का सर्वत्र राजरोसपणे सुरु आहे. परिणामी महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात हुक्क्याच्या नशेच्या अधीन होत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सीवूड्स येथील हावरे मॉलमधील ”पॉट रिपॉट” हुक्का पार्लर.

 

या पार्लरचा चालक सागर तावरे असून स्थानिक पोलिसांच्या साथीने शासनाच्या नियमाना या चालकाकडून तिलांजली देण्यात येत आहे. पहाटे ४ पर्यंत हुक्का पार्लर सुरु ठेवणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध सवलती देत त्यांना हुक्क्याकडे आकर्षित करणे, संबंधित जागेवर दारू सर्व्ह करण्याचा कोणताही पुरावा नसताना ग्राहकांना त्यांची दारू पिण्यास परवानगी देणे अशी विविध धाडसी कृत्ये चालक सागर तावरे याच्याकडून केली जात आहेत. दरम्यान, संबंधित चालकाला हटकले असता पत्रकारांना पैशाचे आमीष अथवा धमक्या दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे संबंधित हुक्का पार्लरवर स्थानिक पोलीस कारवाई करणार का? विद्यार्थ्यांना या दलदलीतून वाचवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

सब मॅनेज होता है…
पॉट रिपॉट या पार्लरवर स्थानिक पोलीस तसेच महापालिका प्रशासनाकडून वारंवार कारवाई करण्यात आली आहे. मात्र अवघ्या काही तासात राजकीय व्यक्तींच्या ओळखी सांगत अथवा पैशाचे आमिष दाखवत ”सब मॅनेज होता है” यानुसार पुन्हा पार्लर सुरु करण्यात येते. दरम्यान, मागील १ ते दीड महिन्यापासून या पार्लरमध्ये जात काही पत्रकारांनी पाळत ठेवली असता आयपीएल, आशिया वर्ल्ड कप, मास्टर कार्ड टी २० सिरीज या स्पर्धात पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात बेटिंग खेळी जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पाळत ठेवण्यासाठी येणाऱ्या पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना सीसीटीव्हीचा धाक दाखवल्याची देखील उदाहरणे काही पत्रकारांकडून सांगण्यात आले आहे.

 

पालिकेची डोळेझाक?
बहुतांश ठिकाणी हॉटेलच्या नावाखाली परवाना घेऊन हुक्का पार्लर चालविले जात आहेत. यामुळे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर, त्या आस्थापनेचा व्यवसाय परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठविले जात आहेत. यानंतरही अशा आस्थापनांवर कारवाईत पालिका अधिकारी चालढकल करत असल्याची खंत पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here