राज्य नाट्यच्या जळगाव केंद्रावर रंगले आहे समन्वयक पदाचे नाट्य

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनामार्फत हौशी कलावंतांसाठी गेल्या ६० वर्षांपासून राबवण्यात येणाऱ्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या जळगाव केंद्राला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. इतर केंद्रावरील वेळापत्रके जाहीर झाली असून, जळगाव केंद्रावर समन्वयक पदाचा वाद सुरु असल्याने, अद्याप जळगाव केंद्राचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

 

जळगाव केंद्रावर १५ संघांनी आपल्या नाटकाची प्रवेशिका दाखल केली असून, अद्यापही वेळापत्रक जाहीर झालेले नसल्याने, त्यांच्यात संभ्रमाची अवस्था आहे. जळगाव केंद्रावर मागील वर्षी असलेल्या समन्वयकाला काही नाट्यकलावंतांचा विरोध असल्याने, त्यांनी त्याविरोधात सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे तक्रार केली होती. दरम्यान समन्वयक पदासाठी शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी अजून दोन व्यक्तींना शिफारस पत्र देवून समन्वयक पदासाठी अर्ज दाखल करायला लावल्याचे समजते आहे. त्यामुळे जळगाव केंद्रासाठी समन्वयक पद अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे पुढील पुर्तता झालेली नसल्याने, जळगाव केंद्रावरील राज्य नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर होऊ शकलेले नाही.

 

आजच नाट्य क्षेत्रात कार्यरत नसलेली पण जळगाव जिल्ह्यातील मोठे नेते असलेल्या मंत्र्याच्या शिफारशीने समन्वयक पदावर निवड झाल्याचे समजते आहे. यानंतर आता रंगकर्मी विरुध्द नवा समन्वयक असे नाट्य पुन्हा उभे राहिले आहे. आता रंगकर्मींनी या नाटकाशी संबंध नसलेल्या नव्या नियुक्त समन्वयकापेक्षा मागच्या वर्षी नाटकाशी संबंधित असलेला समन्वयकच योग्य असून, त्याचीच पुन्हा निवड करावी, अशा मागणीचे पत्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मेलवर पाठवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समन्वयक पद निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज दुपारी सांस्कृतिक कार्य संचालनात होत असलेल्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते आहे.

 

इंदौरच्या नाटकाचाही वाद

 

नाट्यभारती इंदौर या संस्थेकडून गेल्या तीन वर्षापासून सातत्याने प्रथम पारितोषिक मिळत होती. त्यांनी ६० व्या स्पर्धेत सादर केलेल्या डहूळ, ५९ व्या स्पर्धेत सादर केलेल्या मार्फोसिस, ५८ व्या स्पर्धेतील तीरथ में सब पानी है या नाटकांना प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांक मिळाला होता. यामुळे काही जळगावकर नाट्यकर्मींनी नाट्यभारतीला जळगाव केंद्र देण्यात येऊ नये म्हणून अर्ज केला होता. यावर सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांनंतर यंदा ६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाट्यभारती इंदौरच्या संघाला नाशिक केंद्रावर पाठविण्यात आले आहे.

६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रावर नाट्य सादरीकरणासाठी अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव यांचे पुन्हा सलवा जुडूम, डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाचे हॉस्टेल डेज, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरचे वेडात म्हातारे वेगात दौडले, रंगगंध कलासक्त न्यास शल्यशोभा स्त्री आरोग्य भुवन चाळीसगावचे घरटं, शनिपेठ मित्र मंडळ, जळगावचे सेवेची संधी, कै.शंकररावजी काळुंखे चॅरिटेबल ट्रस्ट जळगावचे मुसक्या, मूळजी जेठा महाविद्यालयाचे मडवॉक, सुबोध बहुउद्देशीय युवा विकास प्रतिष्ठान जळगावचे अजूनही चांदरात आहे, इंदाई फाऊंडेशन बदरखे, ता.पाचोरा यांचे राशोमान, ज्ञानसागर ग्रंथालय चाळीसगाव यांचे काय डेंजर वारा सुटलाय, समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडे, ता.एरंडोल यांचे अर्यमा उवाच, कलरवोब मल्टीपर्पज फाऊंडेशन, जळगावचे एक रोज, मध्यप्रदेश मराठी अकादमी इंदौर यांचे सुखांशी भांडतो आम्ही, सार्थक सांस्कृतिक कला संस्था इंदौर यांचे अशुध्द बीजापोटी, संजीवनी फाऊंडेशन जळगाव यांचे अस्सल कार्स अशा १५ प्रवेशिका सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे सादर करण्यात आलेल्या आहेत. मात्र अद्यापही जळगाव केंद्राचे वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने, या स्पर्धा होणार की नाही याबाबत जळगावकर कलावंत संभ्रमात आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here