महाराष्ट्र शिक्षण मंडळाने जाहीर केले १० वी आणि १२ वीचं वेळापत्रक

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं १० वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची लेखी परीक्षा २ मार्च ते २५ मार्चदरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत होणार आहे. विशेष म्हणजे १० वी आणि १२ वीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर १५ दिवसांत त्यासंदर्भात संघटना, पालक आणि शिक्षक यांच्याकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. मग सूचनांचे अवलोकन करून १०वी आणि १२वीचे अंतिम वेळापत्रक ठरवण्यात आले आहे.

 

खरं तर कोरोना प्रादुर्भावामुळे २०२१ला दहावी, बारावी परीक्षा झालेली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

 

दुसरीकडे सीबीएसईनेही १०वी, १२वीची परीक्षा जाहीर केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षांची घोषणा केली आहे. पुढील वर्षी १५ फेब्रुवारीपासून १०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार असल्याची घोषणा बोर्डाने केली आहे. विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर त्यांचे वेळापत्रक पाहू शकतात. सीबीएसई बोर्ड २०२३ इयत्ता १०वी आणि १२वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा पुढील वर्षी २ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणार असल्याचं सांगितलंय. वेळेबद्दल बोलायचे झाल्यास १०वी आणि १२वीच्या परीक्षा सकाळी १०.३० वाजता सुरू होतील आणि दुपारी १.३० वाजता संपतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here