पाटणा (बिहार) : येथे प्रवाशांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीमध्ये बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा बोटीमध्ये १४ प्रवासी होते. यातील ७ जणांना वाचवण्यात यश आले असून ७ जण बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांना युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाटणा जिल्ह्यातील मनेर येथे गावातील लोकं जनावरांचा चारा घेऊन बोटीद्वारे गंगा नदी पार करत होते. याचवेळी बोट अनियंत्रित झाली आणि गंगा नदीमध्ये उलटली. दुर्घटनेवेळी बोटीमध्ये १४ प्रवासी होते. यातील सात जणांना पोहून बाहेर येत स्वत:चा जीव वाचवला. मात्र सात जण बेपत्ता झाले आहेत.
दरम्यान, टुनटुन राय, मेघनाथ राय, झुनझुन साहू, सुधीर राय, अखिलेश राय, मनीष राय आणि पवन कुमार अशी बेपत्ता नागरिकांची नावे आहेत. बोट दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. मनेरचे एएसआय सत्यनारायण सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या एनडीआरएफचे पथक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. .