कर्मचाऱ्यांच्या जीवास धोका
नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालय असलेल्या इमारतीच्या छताला
पावसाच्या पाण्यामुळे गळती लागली असून कर्मचाऱ्यांना कामांमध्ये अडचण निर्माण होत आहे. ब्रिटिशकालीन भूमापन व भूमि अभिलेख कार्यालयाचे दस्तावेज पाण्यात भिजून खराब होत असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
शहादा शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे ठिकाणे पाण्याची डबकी साठली असून त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यात भुमिअभिलेख कार्यालयाची शासकीय इमारतीला पावसाच्या पाण्यामुळे गळती लागली आहे.या इमारतीचे बांधकाम 2003/ 4 या काळात सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडून पूर्ण करण्यात आलेले आहे अशी माहिती मिळते.या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ती भूमापन अधिकारी व भूमी अभिलेख कर्मचारी काम करत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. या इमारतीतील इलेक्ट्रिक स्विच बोर्ड देखील पाणी गळतीमुळे ओले झाल्याने कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत भूमिअभिलेख कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार लेखी तक्रार देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.तक्रारी बाबत अधिक माहिती घेतली असता 2015 पासून ते आजतागायत नियमितपणे भुमिअभिलेख कार्यालयाकडून तक्रारी अर्ज सा. बां. विभाग शहादा यांच्याकडे दाखल करण्यात आलेला आहे तरी यावर कोणतीही कार्यवाही संबंधितांकडून करण्यात आलेली नाही. यातून प्रशासकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर येत आहे. शासकीय इमारतींसाठी दरवर्षी देखभाल व दुरुस्ती खर्चासाठी निधी उपलब्ध होत असतो. तरी या इमारतीचा कुठल्याही प्रकारचे देखरेख व रंगरंगोटी गेले कित्येक वर्षांपासून करण्यात आलेली नाही.
भुमी अभिलेख व भूमापन कार्यालयातील जुनी दस्तावेज ही दिवाणी न्यायालयीन प्रकरणांमध्ये उपयोगाची असतात आणि जर हीच कागदपत्रे पाण्याखाली गेलेत तर सामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल म्हणून यावर योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे..








