भारतीय रिपब्लिकन फेडरेशन सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पनवेलचे कांतीलाल कडू यांची निवड

पनवेल अलिबाग-सोगावकर – प्रज्ञावंतांच्या प्रभावळीने देश पातळीवर निर्माण केलेल्या भारतीय रिपब्लिकन फेडरेशन या सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पत्रकार, कवी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले पनवेलचे सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. बी. घाडगे यांनी कडू यांना नियुक्ती पत्र दिले आहे. घाडगे हे नाबार्डचे जनरल सेक्रेटरी असून ज्येष्ठ सामाजिक नेते म्हणून गणले जातात. ते फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्वप्रणालीचे अभ्यासक आणि विश्लेषक आहेत.
देशातील बहुतांश समाज आर्थिक प्रवाहातून दूर फेकला गेला असून त्यांना संघटित करून बहुजन समाजाची मोट बांधताना त्यांचा वैचारिक स्तर उंचावून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि मूलभूत सुविधा त्यांना मिळवून देण्यासाठी ही संस्था नऊ राज्यात कार्यरत आहे. त्या संस्थेचा विस्तार करताना बुद्धिजीवी वर्गांला एकत्र करण्याचे काम केले जात आहे.
कांतीलाल कडू यांच्या सर्वंकष कार्याची शैली, शेवटच्या घटकाला विश्वासात घेवून त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढण्याची जिद्द, समाजाप्रती असलेली आस्था लक्षात घेवून त्यांची संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संस्थेमध्ये निवृत्त न्यायाधीश, निवृत्त वरिष्ठ शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, प्रज्ञावंत, लेखक, विविध समाजात योगदान असलेले कार्यकर्ते आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here