बीजिंग – कोरोना रुग्णांच्या संख्येत सोमवारी आणखी भर पडल्यामुळे बीजिंगमधील आणखी दहा विभागांत लॉकडाउन लागू करण्यात आले. सोमवारी चीनमध्ये सापडलेल्या ४९ नव्या रुग्णांत बीजिंगमधील आकडा ३६ होता. त्यामुळे संबंधित ठिकाणी वाहतूक आणि नागरिकांवर निर्बंध आणले आहेत.
वायव्येकडील हैडियन जिल्ह्यातील युक्वानडाँग या घाऊक बाजारपेठेत नवे रुग्ण आढळले. ही बाजारपेठ बंद करण्यात आली असून जवळच्या शाळाही बंद केल्या जातील. दहा निवासी विभागांमधील नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. तेथील नागरिकांचा नेमका आकडा काही हजार असेल. याआधी झिनफादी या बाजारपेठेत रुग्ण मिळाले होते. त्यानंतर सामूहिक चाचण्या सुरू करण्यात आल्या. बाजारपेठेतील कामगार, तेथे गेलेले तसेच परिसरातील लोकांच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. आज सकाळी स्थानिक स्टेडियमवर चाचण्यांसाठी लोकांनी रांग लावली होती. त्या वेळी पूर्ण संरक्षक पोशाख घातलेले लोक तेथे बंदोबस्तावर होते.






