पुणे (जिल्हा प्रतिनिधी सुहास गायकवाड) । पती मारहाण करत असल्याने वडिलांनी मुलीला माहेरी आणले. तेव्हा पतीने आपल्या पत्नीला बाहेर बोलावून तिच्यावर स्वत: बलात्कार केल्यानंतर त्याच्या इतर मित्रांनी आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत या विवाहितेवर वारवांर सामुहिक बलात्कार करण्यात आला.
याप्रकरणी मार्केटयार्ड येथील मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात विवाहितेच्या वडीलांनी फिर्याद (गु. रजि. नं. १५२/२३) दिली आहे. हा प्रकार मार्केटयार्डातील संदेशनगर येथे २७ फेब्रुवारी २०२० ते २०२१ दरम्यान घडला. मार्केटयार्ड पोलिसांनी फिर्यादीच्या मुलीचा पती तसेच शैलेंद्रकुमार, अतिशयकुमार, पवन राजेंद्र परदेशी, जितेंद्रकुमार, विजय बन्सी पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या २३ वर्षाच्या मुलीचा गारखेडा येथील पतीबरोबर विवाह झाला होता. तो तिला वारंवार मारहाण करत असल्यामुळे फिर्यादी यांनी आपल्या मुलीला स्वत:च्या घरी आणले. दरम्यान, त्यांनी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर मुलीने पुण्यात आल्यावर झालेल्या घटनेची माहिती दिली.
फिर्यादी यांची मुलगी पुण्यात असताना २० फेबुवारी २०२० रोजी तिच्या पतीने तिला घराबाहेर बोलावले. तिला झुडपामध्ये नेऊन तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. तिला हाताने व काठीने मारहाण केली. त्यानंतर त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. त्याचे त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यांनी कट करुन तिला २०२० व २०२१ मध्ये वारंवार बोलावून गाडीमध्ये अश्लिल चित्रे दाखवून तिच्यावर सर्वांनी वारंवार बलात्कार केला. पोलिसांकडे तक्रार दिल्यास फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होते. शेवटी तिने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.







