नागपूर (प्रतिनिधी मिलिंद खेकाळे) । सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. फेसबुक फ्रेंडने नौकरी देण्याच्या बहाण्याने प्रथम महिलेला नागपुरात बोलवले आणि आपल्या साथीदारासोबत महिलेला नागपूर ग्रामीण भागात नेऊन बलात्कार केला.याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. पिंटू गजभिये आणि कार्तिक चौधरी अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ३२ वर्षांची असून ती मध्यप्रदेशची रहिवासी आहे. तिला दोन मुले असून पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती वेगळी राहते. तिची ओळख आरोपी पिंटू गजभिये याच्याशी ३ वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. आरोपी हा रमना मारोती परिसरात राहत असून तो चालक म्हणून काम करतो. पिंटूने या महिलेला नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने नागपुरात भेटायला बोलवले होते.
रविवारी रात्री १० च्या सुमारास ही महिला बसने मध्य प्रदेश बसस्थानकावर पोहोचली. तेथून आरोपीने तिला कारमध्ये बसवून नागपूर ग्रामीण येथील सावनेर मध्ये घेऊन गेला. यादरम्यान पिंटू गजभिये आणि त्याचा साथीदार कार्तिक चौधरी यांनी महिलेवर बलात्कार केला. रात्रभर तिला गाडीत बसवल्यानंतर पुन्हा सीताबर्डी कॅम्पसमध्ये आणून सोडले.
पीडित महिलेने पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, आरोपींनी महिलेला ज्या गाडीतून नेले होते, त्या गाडीच्या चालकाच्या भूमिकेचाही पोलीस तपास करत आहेत.







