राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशनची ना.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी सतीश चव्हाण) | पोलीस दलातील सुमारे ८०० ते ८५० पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या सन २०२१ पासून पदोन्नती रखडली आहे. याबाबत गृहखात्याने कोणताही निर्णय घेतला नसून, पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
गृहखात्याने याबाबत तात्काळ निर्णय घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची द्विधा मनःस्थितीतून मुक्तता करावी. कारण पदोन्नतीनंतर जिल्हा व विभागनिहाय बदली होत असते. बदलीमुळे मुलांचा शाळा प्रवेश व इतर कौटुंबिक समस्यांबाबत ठोस निर्णय घेता येत नाही. परिणामी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
महसूल खाते किंवा इतर सरकारी खात्यांमध्ये अधिकाऱ्यांची बदली व पदोन्नती नियमानुसार वेळेवर केली जाते परंतु पोलीस खात्यातच या बदल्यांबाबत शोकांतिका जाणवत आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ निर्णय घेऊन ही संभ्रमावस्था मिटवावी, अशी मागणी प्रसिध्दीपत्रकाद्वारे राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी केली आहे.
या प्रसिध्दीपत्रकावर इचलकरंजी शहराध्यक्ष रमाकांत साळी, कोल्हापूर जिल्हा सदस्य परशराम कजगावकर, हातकणंगले तालुकाध्यक्ष मिशांत कुंभार, हातकणंगले तालुका संपर्कप्रमुख राहुल औजार, कबनूर शहराध्यक्ष सागर पाटील, कोल्हापूर जिल्हा सदस्य वैभव शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.







