कोल्हापूर: राजारामपुरी पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगार करण सावंत १ वर्षासाठी जिल्हापार

राजारामपुरी

कोल्हापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर रहीम पिंजारी) । राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार करण उदय सावंत (वय २५, रा. माऊली पुतळा, राजारामपुरी) याच्याविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी करवीर विभाग यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

 

करण सावंत याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, मारामारी आणि दहशत माजवणे यांसारखे शरीराविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर वचक बसवण्यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी त्याला जिल्हापार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी करवीर विभाग यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकारी मोसमी चौगुले यांनी मंजुरी दिल्यानंतर ही हद्दपारीची कारवाई अधिकृतपणे करण्यात आली.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे पो.हे.कॉ ९२२ पाटील, पोलीस अंमलदार अमोल पाटील, सचिन वायदंडे, सचिन पाटील, गजाजन हराळे, विशाल शिरगावकर आणि शाहू तळेकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईमुळे राजारामपुरी परिसरातील गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here