कोल्हापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर रहीम पिंजारी) । राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २९ वर्षीय तरुणावर जुन्या भांडणाच्या रागातून ९ जणांनी तलवार, एडका आणि दगडांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवी गोविंद कांबळे (वय २९, रा. विश्वशांती चौक, कदम नगर, कोल्हापूर) हे १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास राजेंद्र नगर येथील लोखंडे वखार भागात त्यांचे मित्र स्वप्नील ढाकरे यांच्या घरी जेवणासाठी गेले होते.
यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्र्यंबक वसंत गवळी, श्रीमंत गवळी, अमित गवळी, सुमित गवळी, सलीम शेख, सोन्या जगदाळे, कार्तिक बल्लाळ, शुभम उर्फ अक्षय मुळे आणि सचिन कांबळे उर्फ टिंग्या (सर्व रा. सर्वजन राजेंद्र नगर, कोल्हापूर) यांनी संगनमत करून फिर्यादी यांच्यावर हल्ला केला.
यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मुख्य संशयित आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी संगनमत करून फिर्यादी यांच्यावर हल्ला केला. संशयितांनी धारदार शस्त्राने रवी कांबळे यांच्यावर वार केले, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि आरडाओरडा करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले.
या घटनेची नोंद १६ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी सर्व संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय हत्यार कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून राजारामपुरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







