राजारामपुरी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला तलवारीसह केले अटक; घरातून धारदार हत्यार जप्त

राजारामपुरी पोलिसांनी

कोल्हापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर रहीम पिंजारी) | राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका धडक कारवाईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराला धारदार तलवारीसह अटक केली आहे. आरोपीच्या राहत्या घरातून पोलिसांनी ५०० रुपये किमतीची तलवार जप्त केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल शब्बीर शेख (वय २४, रा. १३२७, ई वॉर्ड, यादवनगर मेन रोड, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:५५ वाजण्याच्या सुमारास यादवनगर मेन रोडवरील कन्हैया सर्व्हिसिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या मोमीन गल्लीतील आरोपीच्या घरात ही कारवाई करण्यात आली. राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोकॉ १४४३ राहुल कदम आणि पोकॉ ५५ कुंभार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती. रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल शेख याने आपल्या घरात बेकायदेशीरपणे धारदार हत्यार आणून ठेवले आहे, अशी माहिती मिळताच पोलिसांनी पंचांसमक्ष त्याच्या घराची झडती घेतली. या झडतीदरम्यान घरातून एक धारदार तलवार मिळून आली.
पोलिसांनी ती तलवार जप्त करून आरोपी साहिल शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ५, २५(a)(१) आणि बी.पी. ॲक्ट १३५ प्रमाणे गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मा. नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक मा. आप्पासाहेब जाधव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) मा. प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सो. विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे, पोलीस अंमलदार शाहू तळेकर, विशाल शिरगावकर, गजानन हराळे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here