कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) । शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताराबाई पार्क सारख्या उच्चभ्रू परिसरात एक मोठी घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातील लॉकरमधून तब्बल ८ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिरीष सदाशिव संकपाळ (वय ३१, राहणार: प्लॉट नं. ८,२७२ अ, सहजीवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर; मूळ रा. शिंगणापूर, संकपाळ गल्ली, ता. करवीर) यांचे हे राहते घर आहे. दिनांक १७/०८/२०२६ रोजी पहाटे ०५:३० ते दिनांक १८/०८/२०२६ रोजी सकाळी ०९:३० वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली.
फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय घराबाहेर असताना, अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूचा दरवाजा जोरात ढकलून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट उघडून, कपाटात असलेल्या चावीनेच लॉकर उघडले आणि त्यातील मौल्यवान ऐवज लंपास केला.
सोन्याचे दागिने: ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत ४,९०,००० रुपये), ५ ग्रॅमची सोन्याची चैन (किंमत ७०,००० रुपये), ५ ग्रॅमची अंगठी (किंमत ७०,००० रुपये), ३ ग्रॅमची अंगठी (किंमत ४२,००० रुपये), २ ग्रॅमचा वाळा (किंमत २८,००० रुपये) आणि ३-३ ग्रॅमचे सोन्याचे कानातील टॉप्सचे दोन जोड (प्रत्येकी ४२,००० रुपये). चांदीचे दागिने: ५० ग्रॅमचे चांदीचे तोडे (किंमत १०,००० रुपये), ३० ग्रॅमचा करदोडा (किंमत ६,००० रुपये) आणि ३० ग्रॅमचे ब्रेसलेट (किंमत ६,००० रुपये).रोख रक्कम: कपाटात ठेवलेली ५६,००० रुपयांची रोख रक्कम (१०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय चलनी नोटा).असा एकूण ८ लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या प्रकरणी शिरीष संकपाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ६०६/२०२६ नुसार, बी.एन.एस. (BNS) कलम ३०५(A), ३३१(३), आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहूपुरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.







