ज्वेलर्स विजय ठवकर हत्याकांड; हायकोर्टाने केली तिन्ही आरोपींची जन्मठेप कायम

nagpur-high-court

नागपूर (प्रतिनिधी मिलिंद खेकाळे) : सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम लुटण्यासाठी दिवसाढवळ्या दरोडा टाकून ज्वेलर्स विजय ठवकर यांची बंदुकीच्या गोळीने हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींची जन्मठेप व इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व भारत देशपांडे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. हुडकेश्वर पोलिसांच्या क्षेत्रात घडलेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले होते.

या आरोपींमध्ये बन्नासिंग उर्फ रुपसिंग अत्तरसिंग उर्फ नवनिहालसिंग उर्फ दौलतसिंग बावरी (५२), त्याचा भाऊ जुल्फीसिंग उर्फ सूरजसिंग उर्फ बंबई (५०) व साथिदार दारासिंग उर्फ धारासिंग उर्फ सतवंतसिंग वकीलसिंग बावरी उर्फ सिकलकरी (५६) यांचा समावेश आहे. बन्नासिंग व जुल्फीसिंग हे नांदेड तर, दारासिंग मेहकर, जि. बुलडाणा येथील रहिवासी आहे. चौथा आरोपी पंकजसिंग कालुसिंग दुधानी (४०, रा. अंबरनाथ, जि. ठाणे) याची चार वर्षे सश्रम कारावास व इतर शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

तुकडोजी चौक ते मानेवाडा चौक रोडवरील श्रीराम भवन इमारतीच्या पहिल्या माळ्यावर विजय ठवकर यांचे सोन्याचांदीचे दुकान होते. त्या दुकानात प्रसाद खाडेकर कर्मचारी होता. ते दोघे ६ ऑक्टोबर २०१२ रोजी सकाळी ११ च्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकानात गेले. दरम्यान, ठवकर यांनी तिजोरीतून दागिने काढून शोकेसमध्ये सजवले तर, खाडेकर यांनी दुकानाची साफसफाई केली. त्यानंतर दुपारी १ च्या सुमारास चारही आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारने तेथे आले. सुरुवातीला बन्नासिंगने दुकानात प्रवेश करून खाडेकर यांना चाकू दाखवला व माल काढण्यास सांगितले.

दरम्यान, बन्नासिंगने चाकूची मुठ डोक्यावर मारल्यामुळे खाडेकर ओरडला. तेवढ्यात ठवकर काऊंटरच्या बाहेर आले. परिणामी, दारासिंग दुकानात शिरला व त्याने ठवकर यांना पकडले. त्यांची झटापट सुरू झाल्यामुळे जुल्फीसिंगने दुकानाकडे धाव घेतली. त्याच्याकडे पिस्तूल होते. बन्नासिंगने ते पिस्तूल स्वत:कडे घेऊन गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अपयश आले. त्यानंतर जुल्फीसिंगने त्याच्याकडून पिस्तूल हिसकावून ठवकर यांच्या छातीमध्ये गोळ्या झाडल्या. त्यामुळे ठवकर रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळून मरण पावले. त्यानंतर चारही आरोपी पळून गेले.

घटनेच्या वेळी पंकजसिंग कारमध्ये बसला होता. तो कार चालवित होता. ही घटना घडत असताना आजूबाजूचे दुकानदार व रोडने जाणारे नागरिक गोळा झाले होते. परंतु, आरोपींकडे घातक शस्त्रे असल्यामुळे कोणीच बचावासाठी धावले नाही. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. परंतु, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत वेळ निघून गेली होती.

या प्रकरणातील आरोपींमध्ये शिक्षा झालेल्या आरोपींसह बुटीबोरी येथील दारासिंग मिरसिंग बावरी (५५) व त्याचा भाऊ लखनसिंग (४६) यांचाही समावेश होता. सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरविले होते. तो निर्णय देखील उच्च न्यायालयात कायम राहिला. या आरोपींनी ठवकर ज्वेलर्सची ‘रेकी’ करून मुख्य आरोपींना ‘टिप’ दिली, असे सरकारचे म्हणणे होते. परंतु, यासंदर्भात सरकारकडे ठोस पुरावे नव्हते, अशी माहिती ॲड. आर. के. तिवारी (आरोपींचे वकील) यांनी दिली.

एकूण सहा आरोपी होते मात्र सत्र न्यायालयाने १५ डिसेंबर २०१४ रोजी दारासिंग वगळता इतर तिघांना तर, ३ मे २०१८ रोजी दारासिंगला संबंधित शिक्षा सुनावली. दारासिंगचा विलंबाने शोध लागला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध स्वतंत्र खटला चालविण्यात आला होता. या आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता ते अपील फेटाळण्यात आले. सरकारच्या वतीने अनुभवी ॲड. विनोद ठाकरे यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here