नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात एका तरुण उद्योजकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात गोळीबार करून तरुण उद्योजकाची हत्या करण्यात आली आहे. नागपुरमधील पॉश समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री हा रक्तरंजित थरार झाला. ‘सोशा रेस्टॉरंट’चे मालक अविनाश भुसारी (२८ वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. धरमपेठ परिसरातील सोश्या रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी हे रात्री निंबस लावून समोर आपल्या मित्रांसोबत बसले होते.
अविनाश आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास चार आरोपी दोन मोटरसायकलवरून त्याच्या जवळ आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गोळी लागल्यामुळे अविनाश गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर उपचारासाठी अविनाश भुसारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयामध्ये पोहचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पंचनामा करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या चारही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.







