नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : राज्य परिवहन महामंडळाच्या वरुड बसस्थानकावरच (दि.२४) सायंकाळी शिवशाही बसला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरूप असून, या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या तत्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
वरुडच्या बसस्थानकावर शिवशाही बस (क्रमांक एम.एच. ०९ ई एम १९६१) उभी असताना, अमरावतीकडे जाण्याकरीता प्रवाशी बसले होते. दरम्यान चालकाने बस सुरु केल्यावर अचानक बसच्या इंजिनमधून धुर निघायला लागला. काही वेळातच बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे चालकाचे लक्षात येताच त्याने तातडीने वाहक आणि प्रवाशांना माहीती दिली. त्यानंतर सर्व प्रवाशांना बसमधून सुखरुप खाली उतरविले. या घटनेची माहिती अग्नीशमन विभागाला देण्यात आली दरम्यान, त्यांनी आग नियंत्रणात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर प्रवाशांमध्ये शिवशाही बसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांनीही अशा घटना घडू नयेत म्हणून बसमध्ये असलेल्या बिघाडांची माहिती तत्काळ चालक वा वाहक यांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकाराने एसटीच्या देखभाल व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.







