कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : राज्यातील महिला आणि मुली संरक्षित आहेत का? असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. त्यामागील कारणंही अगदी तसंच आहे.राज्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण प्रचंड वाढत आहे. दर महिन्याला हजारो मुली प्रत्येक जिल्ह्यातून बेपत्ता होत आहेत. असं असताना देखील मुलींवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांचं निर्भया पथक आता कामाला लागलं आहे. महाविद्यालयांच्या परिसरात निर्भया पथकाने धडक कारवाई केली आहे. कॉलेजच्या आवारात फिरणाऱ्या रोडरोमियोंना निर्भया पथकाकडून चांगलाच लाठ्यांचा प्रसाद देण्यात आलाय.
विनाकारण कॉलेजच्या आवारात घुटमळणाऱ्या तरुणाला महिला पोलीस अधिकाऱ्याने श्रीमुखात लगावली. तर इतर तरुणांनाजदेखील काठीचा प्रसाद मिळालाय. यावेळी अचानक झालेल्या कारवाईमुळे तरुणांची चांगलीच धावपळ उडाली. कोल्हापूर शहरातील शाळा महाविद्यालयांच्या आवारात वाढलेल्या अवैध कृत्याच्या पार्श्वभूमीवर निर्भया पथकाकडून ही धडक कारवाई करण्यात आली.







