जळगाव जिल्ह्यात दूध भेसळीविरोधात धडक मोहीम

milk
file photo

जळगाव (कार्यकारी संपादक समाधान पाटील) : जिल्ह्यातील दूधात व दूग्धजन्य पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून १ सप्टेंबर पासून दूध भेसळी विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. १५ सप्टेंबर पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध डेअरी आस्थापनांवर दूध भेसळ व वजनमापनाचे खटले दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली आहे.

अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या समितीत अपर पोलीस अधिक्षक, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व वैध मापनशास्त्र उपनियंत्रक हे सदस्य तर जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत.

दूध संस्था, संकलन केंद्र, प्रोसेसिंग प्रकल्प, दूध व दूग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारे, निर्मिती करणारे, विक्री करणारे, स्विट मार्ट, इतर सबंधित उद्योजक यांच्या तपासण्या धडक मोहिमेत करण्यात येणार आहे. धडक मोहिमेद्वारे कुणालाही त्रास देणे हा उद्देश नसून दूध उत्पादक व दूध, दूग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी शुध्द दर्जाचे दूध व दूग्धजन्य पदार्थ ग्राहकांना द्यावेत. हा यामागील उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here