त्र्यंबकेश्वरमध्ये औषध प्रशासनाची मोठी कारवाई

trambkeshwar-malai-pedha
file photo

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : देवदर्शनाला गेल्यावर देवाला पेढ्याचा प्रसाद अर्पण केला जातो. मात्र प्रसाद म्हणून तुम्ही विकत घेतलेला मलई पेढा तुमच्या आरोग्याला घातक ठरला तर. त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत मोठा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, कुठेही देवाचा प्रसाद म्हणून खात असलेला पेढा नीट पाहूनच खा. नाहीतर तुम्हाला हॉस्पिटलच गाठावं लागेल.

कोणत्याही देवळाबाहेर विविध प्रकारचे पेढे सर्वांनाच आकर्षित करतात. लहान मुलं तर पेढ्यांचा हट्ट करतात. पालकही आधी देवासाठी मग आपल्या मुलांसाठी हे पेढे खरेदी करतात. मात्र हेच पेढे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तुम्ही घेत असलेले पेढे किंवा मिठाईचे पदार्थ शुद्ध असतीलच असं नाही. कारण शुद्धतेच्या नावावर होतेय फसवणूक. भेसळयुक्त पदार्थ ग्राहकांना देत त्यांची हातोहात फसवणूक केली जातेय. तेव्हा सावध रहा. सतर्क रहा

अन्न आणि औषध प्रशासनाने त्र्यंबकेश्वर येथे घातलेल्या छाप्यात प्रसाद म्हणून विकले जाणारे पेढे दुधापासून वा दुधाच्या मलईपासूनही बनवलेले नाहीत तर आरोग्यासाठी घातक असलेल्या पदार्थांपासून हे बनवण्यात आल्याचे समोर आले आहे. दुधाची स्कीम पावडर आणि पाम तेलाचा वापर करुन हे पेढे बनवलेले आहेत. गुजरातमधून विकल्या जाणाऱ्या रिच स्वीट डिलाईट अनलॉग नावाच्या अन्न पदार्थापासून पेढे तयार केल्याचे समोर आलंय. काही दुकानदारांकडे आवश्यक परवाना नसल्याचंही उघड झालंय.

कारवाईदरम्यान नाशिकच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ३२०० रुपयांचे पेढे नष्ट केलेत. तर सुमारे १४ हजार रुपये किमतीच्या डिलाईट स्वीट अनलॉगच्या ८ पिशव्या जप्त केल्या आहेत. पेढे विकत घेताना नेहमीच काळजी घेतली पाहिजे. पेढे उघड्यावरील दुकानातून घेऊ नयेत, खात्रीशीर असलेल्या नामांकित दुकानातून घ्यावेत, पेढे घेताना एक्सपायरी डेट पाहावी, पेढे घेताना तारखेसह आपल्या नावाने बिल घ्यावे, पेढे दुधापासून बनवले की नाही याची खात्री करावी, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here