लखनौ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) : मिर्झापूर शहरात मध्यवर्ती भागात मंगळवारी दिवसाढवळ्या ॲक्सिस बँकेच्या कॅश व्हॅनवर चोरट्यांनी हल्ला केला. यावेळी गार्ड आणि कॅशियरसह तिघांना गोळ्या घालून ३९ लाखांची कॅश लूटली. गंभीर जखमी झालेल्या गार्डचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याच्या साहाय्याने चोरट्यांना शोधण्यात येत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मिर्झापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कटरा कोतवाली भागातील ॲक्सिस बँकेसमोर दुपारी एक वाजता कॅश व्हॅन पैशांनी भरलेला बॉक्स घेऊन ॲक्सिस बँकेत पोहोचली. कॅशियर रजनीश कुमार मौर्य आणि कॅशियर अखिलेश कुमार व्हॅनमधून पैसे काढण्यासाठी व्हॅनजवळ आले. बँकेचा गार्ड जयसिंगही व्हॅनजवळ उभा होता. दरम्यान, पाच ते सहा चोरटे दोन दुचाकीवरून आले.
सर्व हल्लेखोरांनी तोंड झाकले होते. त्या हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. काही गोळ्या गार्डच्या पोटात तर काही दोन्ही कॅशियरला लागल्या. गोळी झाडताच चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, दरोडेखोरांनी व्हॅनच्या समोर ठेवलेली कॅश बॉक्स आणि बॅगही लंपास केली आणि चोरटे पळून गेले.
या दरम्यान आजूबाजूचे लोक आणि बँक कर्मचाऱ्यांनी तीन जखमींना विभागीय रुग्णालयात नेले. तेथे गार्ड जयसिंग याला डॅाक्टरांनी मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटलेली रक्कम अंदाजे ३९ लाख रुपये आहे. सद्यस्थितीत पोलिसांना या चोरट्यांबाबत कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.







