बहुरूपी कलाकार अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण

महाराष्ट्रभूषण अशोक सराफ

ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला महाराष्ट्रभूषण पुरस्कार कलाक्षेत्रातील प्रदीर्घ देदिप्यमान कारकिर्दीचा, मराठीतील सुपरस्टार अभिनेत्याचा, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा गौरव आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयानं, विनोदी भूमिकांनी त्यांनी रसिकांना मनमुराद हसवलं. मराठीसह हिंदी कलाक्षेत्र समृद्ध केलं. मराठीतील ‘सुपरस्टार’ अभिनेता म्हणून नवोदित कलावंतांना प्रेरणा दिली. मार्गदर्शन केलं. वैयक्तिक जीवनातही आदर्श नैतिक मूल्यांची जपणूक केली. त्यांना जाहीर झालेला हा पुरस्कार एका महान कलावंताचा गौरव आहे. कोट्यवधी महाराष्ट्रवासियांनी एका अजातशत्रू व्यक्तिमत्वावर केलेल्या प्रेमाचं हे प्रतिक आहे.

अशोक सराफ यांनी स्वत:ला कधीच विनोदी अभिनेता मानले नाही. मी विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या. यात विनोदी, नायक, खलनायक, चरित्र भूमिकांचा समावेश होता. पण, लोकांनी विनोद लक्षात ठेवले, असे ते नेहमी सांगतात. त्यांनी मराठीत जितकी व्हरायटी दिली तितकी कोणीच दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रभूषण देऊन राज्य सरकारने एका बहुरूपी कलाकाराचा सन्मान केला, अशी भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे. अशोक सराफ यांनी ५० हिंदी आणि एका भोजपुरी चित्रपटात काम केले.

‘दगा’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या खलनायकाला स्त्रिया अक्षरश: शिव्या द्यायच्या. हेच त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचे यश होते. त्यांनी अत्यंत टेरेफीक खलनायक साकारला होता. ‘अरे संसार संसार’ चित्रपटातील त्यांचा व्हिलनही सॉलिड होता, असे असूनही रसिकांनी त्यांच्यावर कॉमेडियनचा शिक्का मारला.

लिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि अशोक सराफ बालपणी एकत्र क्रिकेट खेळले आहेत. गिरगावातील चिखलवाडीमध्ये अशोक सराफ यांचे बालपण गेले. तिथेच समोर सुनील गावस्करही राहायचे. बालपणीची आठवण जपत कालिदास नाट्यगृहात अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरीला सुनील गावस्कर उपस्थित होते. तिथे त्यांनी बालपणीची आठवण सांगितली.

अशोक सराफ यांना जशा विविध प्रकारच्या व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतायला आवडते तसेच त्यांचे काही छंदही आहेत. ते उत्तम तबला वाजवतात. मामा प्रसाद सावकारांकडून लाभलेला अभिनयाचा वारसा त्यांनी आजवर जपला. पण, त्यासोबत तबला वादन आणि वाचनासारखे काही छंदही जोपासले.

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा रसिकांना खूप भावली; पण त्यापूर्वी त्यांनी हिंदीतील काम खूप कमी केले होते, कारण हिंदीमधील ‘मिलते रहो’ ही संस्कृती त्यांना फार पटली नाही. माझे काम दिसत असल्याने मी कशाला भेटायला जाऊ, असे ते म्हणायचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here