मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारच्या कॅपटीव्ह मार्केट योजने अंतर्गत दारिद्र रेषेखालील अंत्योदय योजनेत समावेश असणाऱ्या रेशन कार्ड धारकांना दरवर्षी एक साडी मोफत देण्यात येत आहे. रेशन दुकानांमार्फत या साड्यांचे वितरण सुरू असून, त्या साड्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ठ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे. त्याचबरोबर चांगल्या दर्जाची साडी देण्यात येऊन फक्त अंत्योदय रेशनकार्ड धारकांनाच न देता सर्व रेशन कार्ड धारकांना साडीचे वितरण करण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली.
यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, शासनातर्फे अंत्योदय रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून वर्षाची एक साडी वितरित करण्यात येत आहे परंतु या साडीचा दर्जा अत्यंत सुमार असून पहिल्या – दुसऱ्या धुण्यामध्ये या साड्या विरुन त्याचा पोतारा होईल अशी शक्यता आहे. राज्यातील आमदार खासदारांना आवाहन करते की, त्यांच्या घरातील महिलांनी एक दिवस तरी ही साडी परिधान करावी जेणेकरून या साडीचे पोत व दर्जा लक्षात येईल.
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागा मार्फत राज्यातील एकात्मिक व श्वाश्वत वस्त्र उद्योग धोरण अंतर्गत कॅपटीव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली असून या योजने अंतर्गत या साड्यांचे वितरण होत असून ही साडी यंत्र मागावर विणण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. साडी वितरणासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मुंबई या नोडल संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे. या साडीची शासकीय किंमत महामंडळातर्फे ई निविदेद्वारे केलेल्या करारानुसार सेवा शुल्का सह ३५५ रुपये अधिक ५ टक्के जीएसटी अशी निर्धारित केलेली आहे. बाजारात या दर्जाची साडी प्रत्यक्षात १०० रुपयांच्या आत मिळते.
शासनाने आगामी निवडणुका विचारात घेऊन अत्यंत गाजावाजा करून या साड्यांचे वाटप केले असून प्रत्यक्षात या साड्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. त्यामुळे शासनाने अशी साडी देऊन गरीब माता भगिनींची एकप्रकारे थट्टा केली आहे. शासन निर्णयानुसार वाटप करण्यात येणाऱ्या साड्यांचे वाटप करण्यापूर्वी शासकीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून साड्यांची तपासणी करून घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची आहे परंतु प्रत्यक्षात साड्यांची तपासणी झाल्याचे दिसून येत नाही. तरी शासनाने एकवेळ या साड्यांचा दर्जा तपासून घेऊन यात संबंधित यंत्रणेत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी व माता भगिनींना चांगल्या दर्जाच्या साड्यांचे वितरण करावे. तसेच फक्त अंत्योदय रेशन कार्ड धारकांच साडीचे वितरण न करता सर्व रेशन कार्ड धारक महिलांना साड्यांचे वितरण करावे, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली.







