श्री संत मुक्ताई चांगदेव मंदिरावर आ.एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे यांच्यातर्फे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

संत मुक्ताई मंदिर

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : श्री संत मुक्ताई ह्या खानदेश, विदर्भ, मराठवाडा ,मध्यप्रदेशातील लाखो वारकरी भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. भागवत एकादशी आणि महाशिवरात्रीला या परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो मैल पायी चालून दिंड्यांसह लाखो भाविक भक्त आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला येत असतात.

यावेळी श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर, मेहुण आणि चांगदेव येथे यात्रा उत्सव भरला जातो. कालपासून यात्रोत्सवाला सुरुवात झालेली असून लाखो भाविक भक्त आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी मुक्ताईनगर, चांगदेव येथे दाखल झालेले आहेत. त्यामुळे टाळ मृदुंगाचा गजर, आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष, भजन कीर्तनात सर्व परिसर निनादुन गेला आहे.

महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यातर्फे आदिशक्ती मुक्ताई आणि योगीराज चांगदेव यांच्या पदस्पर्शाने पावन कोथळी, मेहुण,चांगदेव, मुक्ताईनगर या पावन तीर्थक्षेत्रांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान स्थळ श्री क्षेत्र कोथळी, आदिशक्ती मुक्ताई मंदिर श्री क्षेत्र तापीतीर मेहुण, योगिराज चांगदेव मंदिर श्री क्षेत्र चांगदेव , आदिशक्ती मुक्ताई मंदिर श्री क्षेत्र मुक्ताईनगर या पावन तिर्थ स्थानांवर हेलिकॉप्टर मधुन पुष्यवृष्टी करून आदिशक्ती मुक्ताई ,योगिराज चांगदेव यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करताना टाळ मृदुंगाच्या गजरात आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषात भक्ती आणि श्रद्धेचा निस्सीम आनंद देणारा भरलेला वैष्णवांचा मेळा याची देही याची डोळा साठवता आला. यात्रोत्सवानिमित्त प्रथमच मुक्ताई, चांगदेव मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आल्याने, उपस्थित वारकरी भाविक भक्तांमध्ये या नयनरम्य सोहळ्याचे कुतूहल आणि औत्सुक्य दाटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here