पुणे (क्राइम रिपोर्टर प्रशांत महाजन) : राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं उघडकीस येत आहेत. महिला-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच पुण्याजवळ चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेत बस ड्रायव्हर हाच आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्याने बसचे स्टिअरिंग कंटडक्टरच्या हाती दिलं आणि त्याने महिलेशेजारी बसून नको ते चाळे सुरू केले. इंदापुरजवळ चालत्या बसमध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट अक्कलकोट या मार्गावर जाणाऱ्या बसमध्ये ही घटना घडली आहे. बस इंदापूरजवळ आली असताना हा प्रकार घडला. पीडित महिला बसमधून प्रवास करत होती तर आरोपी बस चालवत होता. मात्र त्याने अचानक गाडीच स्टिअरिंग हे बसमधील कंडक्टरच्या हातात दिलं आणि तो त्या महिलेशेजारी जाऊन बसला. त्यानंतर त्याचे घृणास्पद चाळे सुरू झाले. पीडित महिलेने कसाबसा बचाव केला आणि खाली उतरल्यावर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सदर बस ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.







