सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये एस.टी. स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पैसे चोरीचे गुन्हे घडत होते. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस ठाणे यांनी अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून बसस्थानकावर लक्ष केंद्रीत केले होते.
मोहोळ पोलिसांचे डीबी पथक आरोपींचा शोध घेत असतांना पोहेकॉ दयानंद हेंबाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उदगीर येथील दोन महिला सोलापूर ग्रामीण येथे वेगवेगळ्या तालुक्यात जावून तेथील बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे दागिने व पाकीटे चोरी करत असतात व सध्या मोहोळ बसस्थानकावर त्या वावरत आहेत. मिळालेल्या माहितीवर तात्काळ अंमलबजावणी करत डीबी पथक मोहोळ बसस्थानकावर पोहचले. व तेथे वावरत असलेल्या महिलांना महिला कर्मचारी मपोकाँ ललिता हलसंगी यांनी ताब्यात घेतल्यावर, त्यांची विचारपूस केली असताना शोभाबाई माणिक वाघमारे (वय ५५, रा.वडारगल्ली उदगीर) व सुनिता शेशवराव सकट (वय ५०, रा.गांधीनगर उदगीर) अशी नावे समजल्यानंतर अधिक चौकशी करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीत. अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केले असतांना दागिने व पाकीट चोरी करण्यातकरिता आल्याचे त्यांनी कबूल केले. या दोन महिलांनी मोहोळ बसस्थानकावर आठ वेळा, पंढरपूर बसस्थानकावर एक वेळा व बार्शी बसस्थानकावर तीन वेळा गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकीटे चोरी केल्याचे कबूल केले.
याप्रमाणे एकूण १२ गुन्हे उघडकीस आणून एकूण २६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १४,९५० रुपये रोख असा एकूण २० लाख १६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल या दोघींकडून पोलिसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ दयानंद हेंबाडे, चंद्रकांत ढवळे, पोकॉ सिध्दनाथ मोरे, अजित मिसाळ, स्वप्निल कुबेर, अमोल जगताप, अविराज राठोड, संदीप सावंत, मपोकॉ ललिता हलसंदी, सायबर पोलीस पोहेकॉ युसुफ पठाण यांनी पूर्ण केली आहे.







