ठाणे (जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कदम) : पोलीस आयुक्त, नवी मुंबई मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई संजय येनपुरे, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नवी मुंबई संजय येनपुरे, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त परि. २, अशोक राजपुत, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सायबर फसवणूक गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी सायबर पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
न्हावाशेवा येथे राहणारे फिर्यादी यांना सोशल मिडीया TINDER ॲप वरून Emily नावाच्या महिलेने फिर्यादी यांना संपर्क करून त्यांना चांगल्या परताव्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवुन फिर्यादीचे मोबाईल व्हॉटसअॅप नंबरवर www.flowertra.com ही लिंक पाठवुन त्यामध्ये त्यांचे खाते ओपन करण्यास सांगुन फिर्यादीची एकुण १०,४०,२१२/- रक्कम वेगवेगळया बनावट बँक अकाउंटमध्ये घेवुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली म्हणुन न्हावाशेवा पो. ठा. गु.र. क्र. क. ३१८(४) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम- ६६ (ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सायबर सेल, पनवेल वपोनि दिपाली पाटील करीत आहेत.
सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान फिर्यादी यांची फसवणुक केलेली रक्कम ज्या बँक अकाउंट मध्ये घेण्यात आली, त्या बँक खात्यांची माहिती बँकांकडुन घेवुन त्याचे विश्लेषण केले असता, ‘वसई-विरार ‘ येथे बनावट बँक अकाउंट बनविणारी एक टोळी असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार ‘पनवेल सायबर सेल’ पथकाने वसई रेल्वे स्टेशनपासुन १०० मीटर अंतरावर असणाऱ्या बिल्डींगमधील एका शॉपवर कारवाई केली असता, तेथे एकुण ०९ मुले मिळुन आली. त्यातील सुधीर जैन व संदेश जैन या मुलांच्या बॅगेमध्ये एकुण ५२ वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड, १८ मोबाईल, १७ चेकबुक, १५ सिमकार्ड, ०८ आधारकार्ड, ०७ पॅनकार्ड, ०३ ड्रायव्हिंग लायसन्स, ०२ वोटर आयडी कार्ड, बनावट व्यवसाय व्हीजीटींग कार्ड असे मिळुन आले. अधिक तपास करता योगेश जैन व हिमांशु सेन हे अनुक्रमे सुधीर जैन व संदेश जैन हे खोटे नाव धारण करून त्यांचे इतर साथीदारांशी संगनमत करून वसई विरार गोरेगांव इ. ठिकाणी शॉप भाडयाने घेवुन तेथे उत्तरप्रदेश, राजस्थान अशा इतरत्र राज्यातील मुलांना कामाकरीता बोलावुन त्या मुलांच्या नावे वेगवेगळया बँकांचे अकाउंट ओपन करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भाडयाने घेतलेल्या शॉपवर वेगवेगळया मुलांच्या नावे वेगवेगळे बनावट भाडेकरार बनवुन व बनावट पोलीस व्हेरिफीकेशनची कागदपत्रे बनवुन वेगवेगळया बँकांमध्ये व्यवसायांचे करंट अकाउंट ओपन करतात. सदर बँक अकाउंट ओपन केल्यानंतर त्याचे सिमकार्ड व डेबिटकार्ड हे ट्रेनने उदयपुर, राजस्थान येथील त्यांचे साथीदारांना पाठवतात. सदर बँक अकाउंटचा वापर सायबर फ्रॉड करीता केला जातो. सदरची कारवाई मध्ये ईएमसी, सायबर सेल, पनवेलचे वपोनि. दिपाली पाटील, सपोनि वृषाली पवार, मपोहवा. प्रगती म्हात्रे, पो. शि, अतुल मोहिते, पो. शि. विकी भोगम व पो.शि. समीर साळुंखे हे सहभागी होते.







