गडचिरोली (प्रतिनिधी) : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आलंय. गडचिरोलीतील छत्तीसगड सीमावर्ती भागात पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर एक पोलीस जवान जखमी झाल्याचीही माहिती समोर आली. भामरागडमधील कोपरीच्या जंगलात ही चकमक झाली. या घटनेला गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दुजोरा दिला.
गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपरी हा सीमावर्ती भागातील शेवटचा जंगल परिसर आहे. या भागात सध्या चकमक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कोपरीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी जंगलात सर्च ऑपरेशन राबवलं. यादरम्यान ही चकमक झाली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये विध्वंसक कारवाया करून घातपात घडवण्याच्या उद्देशानं मागील दोन दिवसापासून काही नक्षलवादी एकत्र येऊन कट रचनेच्या तयारीत होते. भामरागड तालुक्यातील जंगल परिसरात दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतिश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम .रमेश यांच्या नेतृत्वात सी ६० पथकाच्या २२ तुकड्या व सीआरपीएफ च्या QAT च्या २ तुकड्या या जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी नक्षलवादविरोधी अभियान राबविण्याकरिता रवाना करण्यात आले होते. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
जंगल परिसरात पोहोचताच नक्षलवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस पथकाकडून नक्षलवाद्यांना शस्त्र खाली टाकून शरण येण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र, ते शरण न येता पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवला. सदर गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलीस पथकाकडून दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करावा लागला. या अभियानात पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झालं झालं. सदर जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.







