पुणे (उपसंपादक प्रशांत महाजन) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यापासून शहर पोलिसांनी शहरातील अवैध धंद्याविरोधात मोहिम उघडली आहे. मटका किंग नंदकुमार नाईक याच्या अनेक धंद्यावर छापे टाकून ते बंद केले.
नंदकुमार नाईक याच्यासह जवळपास ७० जणांना अटक केली. त्याचबरोबर जनसेवा भोजनालयाचे रोनक बार या ठिकाणी इमारतीच्या पार्किंगमध्ये बेकायदा भटारखाना सुरु केला. तसेच तेथे घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक कारणासाठी वापर करीत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवार पेठेतील जनसेवा भोजनालय येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी यापूर्वी अनेकदा धाड टाकून कारवाई केली आहे. मात्र, तेथे विनापरवाना सुरु असलेल्या भटारखान्यावर प्रथमच कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस अंमलदार भालचंद्र दिवटे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मालक नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७६, रा. शुक्रवार पेठ) आणि मॅनेजर येंकेश्वर रामदास गायधनी (वय ५४, रा. धानोरी गाव) यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शुक्रवार पेठेतील शिवाजी रोडवरील हॉटेल रोनकवर छापा घातला. यावेळी या इमारतीच्या पार्किंगच्या जागेत बेकायदेशीरपणे विना परवाना बदल करुन त्यामध्ये आपले भोजनालयाचा भटारखाना वजा किचन चालू ठेवलेले आहे. त्या ठिकाणी विना परवाना बेकायदेशीर रित्या घरगुती वापराचे सिलेंडर वापरुन त्या आधारे धोकादायक रित्या आग व ज्वालाग्राही निर्माण करुन जिन्नस व खादयपदार्थ धोकादायक रित्या तयार करीत असल्याचे दिसून आले. भविष्यात कोणतीही अप्रिय घटना अथवा अनुचित प्रकार घडल्यास व अशा प्रकारे उघड्यावर धोकादायक स्थितीत स्वयंपाक तयार करताना आग लागल्यास कोणतीही आग प्रतिबंधात्मक उपाय योजना ठेवल्याचे आढळून आले नाही.
मालकाने आपले जनसेवा भोजनालयात कामकाज करणारे स्वयंपाकी, कामगार, वेटर व येणारे ग्राहक, तसेच अवैधरित्या जुगार अड्डा चालवताना त्यांच्याकडे जुगार खेळण्यासाठी येणारे जुगारी यांचे जिवितास धोका होईल व अशा रितीने बेकायदेशीर व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करीत आहेत.







