कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे तयारीसाठी काहीच दिवस बाकी आहेत. पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहे. दरम्यान उमेदवारी न मिळाल्याने मतदारसंघातील इच्छुकांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने तिसरी उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर कोल्हापुरात मोठा राडा झाला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना उमेदावारी जाहीर केली होती. त्यानंतर नाराज झालेल्या काही अज्ञात कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसकडून अनेक नेते इच्छूक होते.
काँग्रेसच्या जयश्री जाधव या विद्यमान आमदार आहेत. २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपाच्या सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. दरम्यान, यावेळी काँग्रेसने उमेदवार बदलून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या दोन याद्यांमध्ये येथील उमेदवाराबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला होता. मात्र तिसऱ्या यादीतून राजेश लाटकर यांचं नाव जाहीर झाल्यानंतर येथून लढण्यासाठी इच्छूक असलेल्या अन्य नेत्यांचा हिरमोड झाला.
काँग्रेसकडून लाटकर यांचं नाव जाहीर झाल्यानंतर काही अज्ञातांनी मध्यरात्रीच पक्षाच्या कार्यालयावर धडक देत दगडफेक केली. तसेच कार्यालयावरील काँग्रेसच्या चिन्हाला काळं फासत चव्हाण पॅटर्न असा मजकूर लिहिला. या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच दगडफेक करणाऱ्या अज्ञात लोकांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.







