पुणे (क्राइम रिपोर्टर प्रशांत महाजन) : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्ह्यांना आळा बसविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तडीपार व मोक्कामधील फरार अट्टल घरफोड्याला जेरबंद करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले. त्याच्याकडून घरफोडीचे ४ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
पोलिसांनी याप्रकरणी तौसिफ बशीर शेख (मुळ रा. कासेवाडी, भवानी पेठ, सध्या रा़ अन्वरभाई बिल्डिंग, शिवनेरीनगर, कोंढवा) या अट्टल घरफोड्याला जेरबंद केले आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार रवींद्र लोखंडे यांना बातमी मिळाली की, तौसिफ शेख हा कासेवाडी येथील एका रिक्षामध्ये बसलेला आहे. पोलीस पथक तातडीने कासेवाडीत गेले. त्यांनी तौसिफ शेख याला ताब्यात घेतले. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून तौसिफ शेख हा फरार होता. त्यांच्याकडे अधिक चौकशीत ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. त्यात कोंढवा पोलीस ठाण्यातील ३ व सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील एक गुन्ह्यांचा समावेश आहे. वैद्यकीय तपासणी करुन त्याला पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलीस हवालदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, अजित शिंदे, दत्तात्रय पवार, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, पोलीस अंमलदार रवींद्र लोखंडे, महेश पाटील, साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, नारायण बनकर यांनी केली आहे.







