नांदेड (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत होत असून, या मतदारसंघात जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यांच्याच प्रचारासाठी बाचोटी इथं सभेसाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आले होते. प्रचार सभा संपवून परत जात असताना अचानक काही मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झाले. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. या घटनेनंतर लक्ष्मण हाके हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय.
या घटनेनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “प्रचार सभा झाल्यानंतर आम्ही परत जाताना अचानक १०० ते १५० तरुण गाडीसमोर आले. त्यांनी चेहरे पांढऱ्या रुमालांनी झाकले होते. त्यांच्या हातात लाठ्या होत्या आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यावेळी माझ्यासोबत लोहा मतदारसंघातील उमेदवार होते. आमच्यावर भ्याड लोकांनी हल्ला केला. अरे तोंड बांधून काय हल्ला करता? हल्लाच करायचाय तर आमने-सामने या”, असं आव्हान हाके यांनी दिलं.
या घटनेवरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. पोलीस महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार करुन त्यांना हटवलं. त्या रिटायर झालेल्या अधिकारी आहेत. या घटनेला दोन वर्ष झालेत. मात्र, अद्यापही रेगुलर पोलीस महासंचालकाची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळं महाराष्ट्रात पोलीस विभागामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. तसंच महायुती सरकार आल्यापासून कोणाचाही जीव सुरक्षीत नाही. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था चांगली करण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार येणं गरजेचं आहे.”







