पोलिस असल्याची बतावणी करून ६० हजारांचे दागिने केले लंपास

police-theft-arrnament
File Photo

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पोलिस असल्याची बतावणी करत सावंतवाडी शहरात वातावरण बिघडले आहे, तुमचे सोने काढून ठेवा, असे सांगून वृद्धाच्या गळ्यातली चेन, हातातील अंगठी असा 60 हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दोघा अनोळखी इसमांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

घटनेनंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. त्यांचा शोध पोलिस घेत असून, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा तपासण्यात येत आहे. मात्र, उशिरापर्यंत चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. फिर्यादी विठ्ठल बळवंत देसाई (वय ७४, रा. सरमळे) हे सावंतवाडी येथे मुलीकडे आले होते. गुरुवारी सकाळी डॉक्टरांकडे चेकअप करून औषधे आणण्यासाठी जे. जे. मेडिकल येथून समोरील मोती तलावाच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर चालत जात असताना दोन अनोळखी इसमांनी आपण पोलिस असल्याची बतावणी केली. त्यातील एका इसमाने देसाई यांना सावंतवाडी शहरातील वातावरण बिघडले आहे, तुमचे सोने कागदात काढूनठेवा व आमच्याकडे द्या, असे सांगितले. त्यावर त्यांनी गळयातील चेन, हातातील अंगठी काढून संशयित चोरटयाच्या हातावर असलेल्या कागदात ठेवली.

 

देसाई यांचा विश्वास बसावा म्हणून त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराला आपले सोने काढून देण्यास सांगत बनाव केला. त्यानंतर आपल्या साथीदाराच्या गळयावर हात ठेवत ती कागदाची पुडी त्याच्याकडे दिली. त्यानंतर रिकामी कागदाची पुडी देसाई यांच्या हातावर ठेवत तेथून दुचाकीवरुन पोबारा केला.

 

थोड्या वेळाने देसाई यांनी ती पुडी उघडून पाहिली असता त्यात सोन्याचे दागिने नसल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले व तक्रार दिली. तातडीने घटनास्थळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण,पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी भेट दिली. पो. मनोज राऊत, पो. पी. के. कदम यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आढळून आले नाहीत. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा तपासण्यात आली. मात्र चोरटयांचा मागमूस लागला नाही. देसाई यांची मुलगी सावंतवाडी कंटक पाणंद येथे राहत असून ते मुलीला भेटण्यासाठी येतात मात्र गुरुवारी हीच संधी साधत चोरट्यांनी सोन्याचा ऐवज फसवणुकीने चोरुन नेला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here