जळगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाची दिशा हीच माझी दृष्टी – मयुर कापसे

मयुर कापसे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मयूर चंद्रकांत कापसे हे उभे असून, जळगाव शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकास करण्याचा त्यांचा संकल्प आहे. ‘बुलंद पोलीस टाइम्स’च्या प्रतिनिधीशी बोलतांना मयुर कापसे यांनी त्यांची भूमिका मांडली. एखादा पीएच.डी. विद्यार्थी जसा शिक्षणाचे महत्त्व जाणतो आणि या शिक्षणाच्या बळावर त्यांनी जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी योजलेल्या योजना आणि संकल्प त्यांनी यावेळी मांडले.

 

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, जळगाव शहराचा विकास करताना, शहरातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांचा समावेश करणे माझे प्राथमिक उद्दिष्ट आहे. महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या सर्वांना एकत्र घेऊन शहराच्या उभारणीचा मार्ग सुकर करायचा आहे. महिलांच्या रोजगार संधी, युवकांसाठी उद्योगक्षेत्रात प्रोत्साहन, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा हे माझे उद्दिष्ट राहील.

 

शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक उपक्रम
शाश्वत विकासाची संकल्पना लक्षात घेऊन जळगाव शहरात पर्यावरणपूरक प्रकल्प राबविणे माझा मुख्य हेतू आहे. स्वच्छ, हिरवेगार, आणि टिकाऊ जळगाव घडविण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक सुधारणे, सायकल ट्रॅक, उद्यानांची संख्या वाढवणे आणि पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे माझ्या कार्यसंकेतात आहे.

शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर
शहरातील शाळा व महाविद्यालये अद्ययावत करणे, शिक्षणाच्या पद्धतींमध्ये सुधारणा घडवून आणणे, आणि नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर उभारणे हाही माझा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. जळगाव शहरातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी, मला शैक्षणिक क्षेत्रात नवी साधने, डिजिटल लर्निंगची संकल्पना, आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्याचा मानस आहे.

आरोग्य आणि सुरक्षितता: सुरक्षित आणि सशक्त जळगाव
शहरातील आरोग्य सेवा सुलभ, सशक्त आणि सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन उपक्रम राबवणार आहे. रुग्णालये, औषधालये यांचा दर्जा सुधारून, प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, अशी योजना माझ्या मनात आहे. तसेच, महिला आणि मुलांसाठी सुरक्षित जळगाव घडवण्यासाठी पोलिसांची मदत घेऊन शिस्तबद्ध व्यवस्था तयार करणे हे देखील माझ्या कार्यक्रमाचे महत्त्वपूर्ण अंग आहे.

उद्योग आणि रोजगार निर्मिती: आर्थिक विकासाचे साधन
शहरातील उद्योग क्षेत्राचा विकास करणे आणि त्यातून नवीन रोजगार संधी निर्माण करणे हाही माझा प्रामुख्याने विचार आहे. जळगावच्या तरुणांना नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उद्योगधंद्यांना आकर्षित करणे, तसेच लघुउद्योगांना प्रोत्साहन देऊन तरुणांच्या कष्टाला योग्य दिशा देणे ही माझी जबाबदारी आहे.

 

पुढे ते म्हणाले की, जळगाव शहराला महाराष्ट्रातील अग्रगण्य शहर बनवण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. या शहराच्या विकासासाठी संपूर्ण योगदान देण्यास मी वचनबद्ध आहे. जळगावकरांच्या सहकार्याने, जळगाव शहराला विकसित, प्रगत आणि समृद्ध बनवण्याचे ध्येय निश्चितच साध्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here