जळगाव (संपादक सुनिल पाटील) : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते व जळगाव शहराचे नऊ वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व केलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी शहर विधानसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांना आशीर्वाद दिलेत. गुरु-शिष्यांची झालेली ही जिव्हाळ्याची भेट अत्यंत सुदृदयपूर्ण वातावरणात झाली.
१९८० पासून ते २०१४ पर्यंत सलग विधानसभेत प्रतिनिधीत्व केलेले सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनात एक कार्यकर्ती म्हणून जयश्री महाजन यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती. दादांनी त्यांना नगरसेविका पदाची संधी दिली. त्यांचे पती डॉ. सुनिल महाजन यांना सुद्धा सुरेशदादा जैन यांनी नगरसेवक तसेच उपमहापौर पदाची तसेच महानगरपालिका विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिली. दादा राजकीय पटलावरुन बाजूला झाल्यावर देखील महाजन दाम्पत्याचे सुरेशदादा जैन याचेशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध कायम राहीलेत. मुंबई व जळगाव येथे सुरेशदादांच्या भेटी होत असत. त्यांचेकडून मार्गदर्शन घेत असत. नंतर कालांतराने आपल्या राजकीय कौशल्याची चमक दाखवीत सौ. जयश्री महाजन यांनी शहराचे महापौरपद देखील भुषविले. महापौरपदी विरामान झाल्यावर देखील सुरेशदादा जैन यांनी जयश्री महाजन यांना आशीर्वाद दिला होता. लोकांची चांगली कामे कर अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
जयश्री महाजन यांनी भेट घेतल्यावर सुरेशदादा जैन यांचा आशीर्वाद घेतला. आपली एक शिष्या राजकारणात पुढे जातेय हे पाहून दादांच्या चेहऱ्यावर झळलेले समाधान आनंददायी होते. यावेळी बोलतांना जयश्री महाजन म्हणाल्या की, आदरणीय दादांनी शहराचा विकास कसा असतो याचे एक उत्तम उदाहरण दाखवून दिले होते. त्यांच्या नेतृत्वात काम करतांना नेहमीच काही ना काही नवीन शिकायला मिळत असे. केवळ जनतेशी व जनहिताशी प्रामाणिक राहून काम कसे करावे हे मी त्यांचेकडून शिकले आहे. आज माझ्या गुरुंनी मला ‘विजयी भव’ म्हणून दिलेला आशीर्वादामुळे उत्साह निर्माण झाला आहे. शहराची चांगली सेवा कर, तळागाळातल्या जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम कर, जनतेशी प्रामाणिक रहा असे त्यांनी मला सांगीतले.







