सातारा (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) :गोडोली येथील गौरव रेसिडेन्सी मध्ये घरफोडी करून फरार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला सातारा शहर पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका परिसरात पाठलाग करून पकडले .पोलिसांनी पाळत ठेवून अवघ्या महिन्याभरात हा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. राजकुमार उर्फ राजू ओमकार आपचे (वय 30, रा. कोथळी, ता. उमरगा) व हर्षद सत्तार बागवान (वय 32, रा. शनिवार पेठ, कच्छी स्टार बिल्डिंग, सातारा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
दि. २६ नोव्हेंबर२०२४ रोजी गौरव रेसिडेन्सी गोडोली येथे बंद घराचे कुलूप तोडून या दोघांनी सोन्याचे दागिने चोरी केले होते. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून उमरगा तालुक्यात आरोपीवर पाळत ठेवली. हा आरोपी उमरगा तालुक्यातील नातेवाईकाकडे जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी आरोपीला मोटार सायकलवरून जाताना हटकले. त्यावेळी तो मोटार सायकल सोडून शेतातून पळू लागला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली.
ओंकार आपचे हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर २५ घरफोड्या केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या चौकशीमध्ये साताऱ्यातील बागवान हर्षद याचे नाव पुढे आले असून त्यालाही ताब्यात घेण्यात आली आहे. दोघांकडून चोरीच्या पुण्यातील पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल जायपत्रे करीत आहेत.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सुधीर मोरे, अशोक सावंगी, निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, मोहन नाचन, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, अमोल निकम, मच्छिंद्र माने, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, सुशांत कदम ,तुषार भोसले, यांनी तपासात सहभाग घेतला होता.







